पालक पनीर खाणेआरोग्या साठी चांगले का नाही?
तुम्ही रेस्टॉरंट मध्ये असाल किंवा तुम्ही तुमच्या घरी पार्टीची योजना आखत असाल तेंव्हा पालक पनीर हा पार्टी मधला महत्त्वाचा मेनू असतो. पालक पनीर हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे,ज्याचा आस्वाद सर्वांनाच घ्यायचा असतो. ही डिश मुख्यतः शाकाहारी लोकांना आवडते.पालक पनीरला अनेक लोक पॉवर पॅक कॉम्बिनेशन मानतात कारण पालक मध्ये भरपूर लोह असते असा सामान्य समज आहे. परंतु पालकाचे रसायनशास्त्र स्पष्ट करते की पालक हे लोहाचे स्त्रोत आहे परंतु त्यात लोहाचे प्रमाण इतर पालेभाज्या प्रमाणेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात नॉन हिम आयर्न आहे जे मानवी शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते. (वनस्पतींमध्ये असलेल्या लोहाला नॉन-हिम आयर्न म्हणतात व मांसाहार मध्ये असलेल्या लोहाला हिम आयर्न असे म्हणतात) पालकामध्येे ऑक्सालिक ऍसिड ही भरपूर असते. पनीर हा कॅल्शियम चा समृद्ध स्त्रोत आहे यात शंका नाहीे.जेंव्हा आपण पालक पनीर घेतो तेंव्हा पालकामधील लोह आणि पनीर मधील कॅल्शियम एकमेकांच्या पोषक द्रव्यांचे शोषण करण्यास अडथळा आणतात. हे पदार्थ एकत्र घेतल्यास कॅल्शियम लोहाचे शोषण रोखते. जर तुम्हाला पालक पनीर मध्ये असलेल्या पोषक तत्त्वांचा पुरेपूर फायदा घ्यावयाचा असेल तर ते एकत्रित न खाता वेगवेगळे खाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.फक्त पालक पनीरच नव्हे तर कोणताही पदार्थ ज्यामध्ये कॅल्शियम व आयर्न एकत्रित आहे असे कोणतेही मिश्रण शक्यतो टाळावे. जेंव्हा तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तेंव्हा तर ही डिश पूर्णपणे टाळली पाहिजे कारण ऑक्सालेट्स हे किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत आहेत.
एखादा पदार्थ ज्यावेळी आपण खात असतो त्यावेळी त्या पदार्थाचे स्वरूप खूप महत्त्वाचे असते म्हणजेच तो पदार्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला सर्व ते पोषक तत्वे देतो की नाही याची थोडीशी माहिती आपण करून घ्यायला हवी.एखाद्या पदार्थाला नुसतीच चव आहे म्हणून तो पदार्थ खाणे हे शरीराला हानिकारक ठरू शकते म्हणून कोणताही पदार्थ खाताना त्यामध्ये असलेले घटक हे एकमेकांशी सुसंगत आहेत का याचे थोडेसे तरी ज्ञान आपल्याला हवे.
(सदरचा लेख हा श्रीनिवास जाधव यांनी लिहिला असून ते औषध निर्माण शास्त्र पदवीधर आहेत)